सोमवार, १८ जानेवारी, २०१०

Me Aani Majhya Kaita

*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
मी आणि माझ्या कविता... -नवज्योत वेल्हाळ, नरवण-गुहागर, भ्रमणध्वनी क्र. ०९४२१४३८००७ ,०८०९७१६८३२०
*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=*=
भुतकाळातल्या आठवणी
जेव्हा काळजाला टोचतात,
अनावर होऊन मनाला
हळव्या कविता सुचतात...
-नवज्योत
===========================================================================
माझी पहिली कविता...

खाऊचे झाड... (इयत्ता - सहावी)

अंगणात मी लावले खाऊचे झाड
त्याची झाली भराभर वाढ

झाडाला आले मिठाईचे पुडे
त्यामध्ये होते बर्फ्या आणि पेढे

मॅंगोचे चॉकलेट आले झाडाला
ते पाहून आनंद झाला ताईला

झाडाला आले बेसनचे लाडू
आपण जाऊन ते भराभर काढु

एकच प्रार्थना आमची देवाला
दिर्घायुष्य लाभो खाऊच्या झाडाला
-नवज्योत

==========================================================================
हरवलेल्या वाटेवर.....

मावळतीचा सुर्य आणि
फेसाळणा-या लाटा...
आठवणींच्या गावातल्या
हरवलेल्या वाटा...
ओढत नेतात पुन्हा पुन्हा
तुझ्या स्मृतींच्या सागराकडे...
आणि मागतात आठवणींचे ते वेडे क्षण
त्या भिरभिरणा-या वा-याकडे...
वाराही मग आठवून ओळख
म्हणतो मला ठावूक होतं...
तिच्या आठवणींत मन तुझं
अजुनसुद्धा भावूक होतं...
अशी रे कशी अचानक
ती तुला विसरून गेली...
भुतकाळाच्या क्षितिजावर
आठवणींचा प्राजक्त पसरून गेली...
मी म्हणतो वा-याला
तिचा प्राजक्त आता कोमेजतोय...
सुगंध मात्र अजुनही
मनात मझ्या दरवळतोय...
मावळतीचा सुर्य म्हणतो
मित्रा आता परत जा...
तिच्यात गुंतुन राहू नकोस
कधीतरी फक्त स्मरत जा...
मी ही म्हणतो निघता निघता
भुतकाळ मला विसरयचाय...
आठवणींच्या सागरावरती
वर्तमान मला पसरायचाय...
तरीही कधी पुन्हा आलीच ती
तर फक्त वाचुन बघ तिची नजर...
दिसतो का बघ कुठेतरी
माझ्या आठवणींचा त्यात 'पाझर'...
-नवज्योत
============================================================================
पावसाच्या चारोळ्या...

पावसाचं आणि माझं
एक वेगळंच नातं आहे,
खरं तर त्याच्याकडे
माझ्या आठवणींचं खातं आहे...

आत्ता कुठे वादळ जरा
शांत होऊ पाहतंय,
तर अधीर होऊन आभाळ
बरसायला धावतंय...

मागे वळुन पाहताना
ढग आठवणींचे दाटतात,
बरसताना दोन थेंब
गालांवर सांडतात...

कुठुनतरी अचानक
ते पावसाचं येणं,
हळवं होऊन पापण्यांचं
नकळत ओलं होणं...

थोडासा का होईना पण
पाऊस आता सरला होता,
तुझ्या आठवणींचा पूर
तेव्हाच कुठे ओसरला होता...

कधी अचानक पाऊस
सरकन येऊन जातो,
तुझ्या जुन्या आठवणी
पुन्हा देऊन जातो...

अजुनही सगळं कसं
स्वप्नवत वाटतंय,
लख्ख ऊन पडलंय तरी
आभाळ मनात दाटतंय...

भरून आलेलं आभाळ
पावसाला खाली पाठवेल,
जरा भिजून बघ पावसात
तुला सगळं जुनं आठवेल...

तु यायचीस तेव्हा
नेमका पाऊस असायचा,
आठवणींचा एक थेंब व्हायला
तो किती आतूर असायचा...

कुणीतरी म्हणालं
हे असं घडणारच होतं,
पावसाआधीच्या वादळात
घर तुझं मोडणारच होतं...

तुझं येणं असतं
वळवाच्या पावसासारखं,
थांबणंसुद्धा थोडाच वेळ
थंडीतल्या दिवसासारखं...

मनातलं आभाळ आणि
मनातलाच पाऊस,
तरीही माझ्या मनाला
त्यात भिजायची हौस...

तुझ्या आठवणी येतात
बरसणारा पाऊस पाहताना,
पाऊस मात्र हसत असतो
डोळ्यांतुन आसवं वाहताना...

मी गेल्यावर एक थेंब
जेव्हा तुझ्या डोळ्यांतुन पडेल,
पाऊसही मग तेव्हा
अगदी मनापासुन रडेल...

माझ्या भुतकाळात पावसाला
एक खास असं स्थान आहे,
जसं कवितांच्या वहीत कुठेतरी
तुझ्या आठवणींचं एक पान आहे...

आभाळाच्या छातीवर
मेघांची दाटी,
आणि थेंबांना झेलायला
आतुरलेली माती...

तुझ्या आठवणींत एक मेघ
आज मनापासून रडला,
लोकांचं आपलं काहीतरीच
म्हणे आज पाऊस पडला...
-नवज्योत
==========================================================================
चारोळ्या...

स्वप्नातल्या कळ्यांना
प्रत्यक्षात फुलताना पहायचंय,
न फुललेल्या कळ्यांनाही
सोबत घेऊन जगायचंय...

कुणीतरी हवं आहे मला
माझं हळवेपण जपणारं,
आयुष्याच्या खडबडीत वाटेवरचे
खाच-खळगे लिपणारं...

सांगेन सांगेन म्हणताना
सांगायचं राहून गेलं,
अबोल गुपीत डोळयांतलं
आसवांनी वाहून नेलं...

भुतकाळाच्या गाठोड्यात
आठवणींची साठवण,
आणि जीवापाड जपलेली
त्यातली प्रत्येक आठवण...

तु समोर दिसलास कि
मन तुझ्याकडे धावतं,
उरात दबलेल्या आठवणींचं
तेव्हा चांगलंच फावतं...

आठवणींचा रस्ता आणि
पुसट पाऊलखुणा,
एकटीच चाललेय त्यावरून
तु तेवढा उणा...

आठवतं तुला, आपलं
किना-यावर भेटणं,
स्वप्नांच्या नौकेत बसून
स्वैर भरकटत सुटणं...

एकदा पाहिलंय मी तुला
भातुकलीने खेळताना,
खोटं खोटं पोळलं तरी
हळुवार फुंकर घालताना...

आठवतात अजुनही
ते भारलेले क्षण,
भांबावलेले डोळे आणि
आतुरलेलं मन...

ओठ स्तब्ध असताना
तुझे डोळे बोलत होते,
तुझ्या नकळत ते तुझं
गुपित खोलत होते...

रात्रंदिवस माझं
तुझी स्वप्नं पाहणं,
जसं तहानलेल्या जीवाचं
मृगजळामागे धावणं...

पापण्यांच्या आडोशाने
तुला हळुच बघताना,
मला कळायचंही नाही
माझ्यातुन 'मी' निघताना...

थकला भागला सुर्य आता
मावळतीकडे सरकत होता,
जाता जाता उगवता चंद्र
कौतुकाने निरखत होता...

परवा काही 'हीर'
उंचावर मिरवत होते,
आज मात्र तेच
अंगण सारवत होते...

कधी मलाही वाटतं
हे बंद दार उघडावं,
आणि पक्षी होऊन आभाळात
स्वैरपणे बागडावं...

कधी एकांत मिळाला कि
बसतो कविता करायला,
तुझ्या आठवणी असतातच
मला शब्द सुचवायला...

झेप घ्यावी गरूडासारखी
आकाश भेदणारी,
नजर तर सोडाच पण
कल्पनाही न पोचणारी...

पहावी म्हणतो डोळे भरून
उगवणारी प्रभा,
तर काळोख सांगतो ओरडून
मी जवळच आहे उभा...

पौर्णिमेचा चंद्र आणि
चमचमत्या चांदण्या,
माजलेल्या काळोखाला
प्रकाशाच्या गोंदण्या...
-नवज्योत
==========================================================================
निर्बंध आसवांना...

निर्बंध आसवांना मज घालता ना आले
आव्हान हासण्याचे मज पेलता ना आले

सजली जरी निशा ही त्या चंद्रतारकांनी
हातांत चांदण्याला मज झेलता ना आले

कळले तुला ना तेव्हा हे गुज अंतरीचे
नजरेत भावनांना तुज तोलता ना आले

केव्हा तरी तुला मी स्वप्नांत भेटलो गं
जागेपणी तुझ्याशी मज बोलता ना आले

हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला
माझ्याच काळजाला समजावता ना आले
-नवज्योत
=========================================================================

हातात आज माझ्या...

हातात आज माझ्या तुझा हात नाही
तु सोबती तरी का तुझी साथ नाही

रंगांनी सात सुरांच्या मैफिली त्या सजल्या
मैफिलीतले तुझे मी गीत गात नाही

देऊ कसा सांगना प्रतिसाद मी तुला
कंठातली तुझ्या ती हाक आर्त नाही

मागुन वार तु केलेस जरी मजवरती
फसवुन मारण्याची माझी गं जात नाही

शब्दांनी सुखाच्या मी गोंजारले दु:खांना
यत भोगले तरी का मी सुखात नाही
-नवज्योत
=========================================================================

घेऊन ज्ञानाची तलवार

महाराष्ट्राच्या ज्ञानी तरूणा
चल उठ अन हो तैय्यार,
करूया ठार असुर अज्ञानी
घेऊन ज्ञानाची तलवार

भेदांनी अन जातियतेने
ग्रासली अवघी जनता,
लोप पावली, नष्ट जाहली
जनाजनातील समता,
करूया चल दूर विषमता
पाजुनी समतासार
घेऊन ज्ञानाची तलवार

रोगांनी अन समस्यांनी
जन हे अति गांजले,
घेऊनी फायदा अडाण्यांचा
बुवा-भगत माजले
देवाच्या नावाने करती
अघोरी हिंसाचार
घेऊन ज्ञानाची तलवार

पवित्र विद्या ही तर आहे
जीवन संजीवनी,
महती तिची पटवून देऊ
घराघरात जाऊनी
मिळेल शक्ती करतील सारे
विचार सारासार
घेऊन ज्ञानाची तलवार

विद्येच्या साह्याने होईल
सफल तयांचे जीवन,
रागाने मग तोडून देतील
गुलामीची वेसण
स्वातंत्र्याच्या आनंदाने
सुखावतील ते फार
घेऊन ज्ञानाची तलवार
-नवज्योत
============================================================================